माझे गाव

सुखवाडी,

ता. पलूस जि. सांगली.

नावाविषयी माहिती–

  • आदिलशाही साम्राज्यकाळात बंडखोर सरदार, सेनापती आदिलशहाला सोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील झाले.  आदिलशहाकडून जिवितास धोका असल्याने लपत–छपत हिंडत होते. त्यावेळी आसरा म्हणून या भुमीत वसाहत करु लागले.  त्यावेळी निर्भीड अरण्य, कृष्णामाईचा शांत प्रवाह परिसर वनराईने नटलेला अशा भूमीत थोर सिध्द पुरुष सद्गुरु भारती महाराजांची समाधी स्थळ होते असे सांगतात की, सद्गुरु भारती महाराज कृष्णाकाठावरुन साधना करीत भिलवडी येथे आले आणि भिलवडीपासून दक्षिणेस 6 कि.मी असलेल्या एका निर्जन ठिकाणी तपश्चर्येस बसले त्यांचा सेवेकरी वर्ग भिलवडीचे पाटील घराणे होते.  त्यांची आजही श्रध्दा या सद्गुरुवर आहे. त्यांच्या अनुषंगाने हळूहळू वसाहत वाढत गेली.  रोगराई नाही कोणत्याही प्रकारचे भय नाही. कृष्णेचे थंडगार पाणी निसर्ग यामुळे सौख्य व समृध्दी पुरेपुर होती. म्हणून या गावास सुखवाडी असे संबोधण्यात येवू लागले.
  • सुखवाडी गावाची माहिती – सुखवाडी हे गाव 1840 साली वसले आहे. त्यावेळी याठिकाणी फक्त भारती मठ हे देवस्थान होते. तसेच सुखवाडी गावामध्ये लक्ष्मी, विठ्ठल, रुक्मिणी यांची मंदीरे आहेत. या गावाच्या पुर्वेला ब्रम्हनाळ हे गाव आहे. त्या गावाचे देवस्थान आनंदमुर्ती मठ हे कृष्णेच्या काठी वसले आहे. या देवाची यात्र माघ महिन्यात महाशिव रात्रीला असते. त्या यात्रेत सुखवाडी, ब्रम्हनाळ, चोपडेवाडी, तुंग, खटाव, वसगडे इ. भागातील गावाचे लोक यात्रेसाठी सहभागी होतात. तसेच सुखवाडी गावातील भारती मठामध्ये दसरा सण मोठया उत्साहाने साजरा केला जातो. भारती मठ हे अतिशय जागृत देवस्थान आहे. गावातील लक्ष्मी देवीची यात्रा वैशाख महिन्यात अक्षय तृतीयेच्या पाचव्या दिवशी मोठया आनंदाने साजरी केली जाते. त्याचबरोबर गावामध्ये हनुमान जयंती, दत्त जयंती, तुकाराम महाराज बीज, ज्ञानेश्वर पुण्यतिथी, रामनवमी, गोकुळ अष्टमी, गाथा पारायण तसेच महिन्यातील प्रत्येक एकादशीला भजन महिन्यातून एकदा किर्तन होते. भारती मठामध्ये रोज संध्याकाळी हरीपाठ होतो. त्यासाठी गावातील महिला पुरुष, मुले मोठया संख्येने हजर असतात.
  • गावामध्ये युवक मंडळे आहेत, विराट सोशल ग्रुप, अचानक ग्रुप अशी ही दोन मंडळे आहेत. गावामध्ये एक गाव एक गणपती. दुर्गामाता उत्सव हे कार्यक्रम सुध्दा एकोप्याने राबवतात. त्याचबरोबर गावामध्ये शिवजयंती सुध्दा साजरी केली जाते. गावामध्ये 14 बचत गट 25–2–2003 ला स्थापन झाले आहेत. 25–2–2007 ला बी.पी.एल ने दोन गटांची स्थापना केलेली आहे. बचत गटाचे कामकाज खाते जिल्हा मध्यवर्ती बॅंक सांगली या ठिकाणी आहे. बचत गटातील महिलांना बॅंकेमाफ‍र्त कर्जपुरवठा करुन महिलांनी शेळी, म्हैस पालन, शेवयाचे मशिन असे लघुउद्योग सुरु केले आहेत.
    सुखवाडी ग्रामपंचायतीची 14–9–2007 रोजी निवडणूक बिनविरोध झाली आहे. गावाने महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानामध्ये भाग घेतला आहे. त्यामध्ये गाव 100% तंटामुक्त झालेले आहे. गावामध्ये जि.प. शाळा 1.ली ते 7.वी पर्यंत आहे. एक अंगणवाडी आहे जि.प. शाळा व अंगणवाडी मध्ये वेगवेगळी स्वच्छतागृह आहेत. गावच्या दक्षिणेस कृष्णा नदी वहाते. नदीच्या पलिकडे सांगली–इस्लामपूर रोड आहे. गावाच्या पश्चिमेस भिलवडी गाव आहे. गावाचा व्यवहार आठवडा बाजार भिलवडीला होतो. गावातील 30% लोक सदन आहेत. 70% लोक मोलमजूरी करुन जगतात. गावामध्ये कृष्णा नदीस 1–8–2005 ला महापुराने गावाला वेढा दिला होता. त्यावेळी गावातून बाहेर जाण्याचा मार्ग म्हणजे होडीने लोकांना बाहेरकाढून लोकांचे जीव वाचविले.
  • 29–7–2006 रोजी महापूर आला. त्यावेळी मात्र लोकांनी गाव सोडले नाही. भारती महाराजांची कृपा म्हटले तरी हरकत नाही. परंतु पिकाची हानी फक्त पुराने झाली. तरीही सुखवाडीतील लोक काबाडकष्ट करुन आपले जीवन सुखा समाधानाने जगतात व समाधानी आहेत. म्हणूनच या गावाला सुखवाडी हे नाव दिले आहे. असे म्हटले तरी हरकत नाही.